नवी दिल्ली : Narendra Modi : 'भारताला जी २० अध्यक्षपदाचे अनेक सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. यापैकी काही माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहेत', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोलत होते. '२०४७ पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र असेल', असंही मोदी यावेळी म्हणाले.
भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल : 'जगाचा जीडीपी केंद्रित दृष्टिकोन आता मानव केंद्रित दृष्टिकोनात बदलत आहे. सर्वांचा पाठिंबा, सर्वांचा विकास हे जगाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्त्व ठरू शकतं', असं मोदी म्हणाले. जगाने जी २० मध्ये आमचा दृष्टीकोन केवळ कल्पना म्हणूनच नव्हे तर भविष्यासाठीचा रोडमॅप म्हणून पाहिला. आधी भारत हा एक अब्ज भुकेल्या पोटांचा देश म्हणून पाहिला जात होता, आता तो एक अब्ज महत्त्वाकांक्षी मनांचा आणि दोन अब्ज कुशल हातांचा देश म्हणून पाहिल्या जातोय, असं ते म्हणाले. तसेच एका दशकापेक्षा कमी कालावधीत पाच स्थानांची झेप घेतल्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'नजीकच्या भविष्यात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल'.
जी २० वर पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळला : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी २० बैठका घेण्यावर पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळून लावला. 'भारताच्या प्रत्येक भागात बैठका घेणं स्वाभाविकच आहे', असं ते म्हणाले. यावेळी मोदींना रशिया-युक्रेन युद्धावर आपलं मत मांडलं. 'वेगवेगळ्या ठिकाणी विविध संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग संवाद आणि मुत्सद्दीपणा आहे, असं ते म्हणाले.
बनावट बातम्यांमुळे अराजकता निर्माण होऊ शकते : 'दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सायबर क्षेत्राने नवा आयाम दिलाय', असं पंतप्रधान म्हणाले. दहशतवादी त्यांचे नापाक मनसुबे पूर्ण करण्यासाठी डार्कनेट, मेटाव्हर्स आणि क्रिप्टोकरन्सी प्लॅटफॉर्म वापरत आहेत. राष्ट्रांच्या सामाजिक जडणघडणीवर याचा परिणाम होऊ शकतो. बनावट बातम्यांमुळे अराजकता निर्माण होऊ शकते आणि वृत्त माध्यमांची विश्वासार्हता खराब होऊ शकते. त्याचा उपयोग समाजात अशांतता निर्माण करण्यासाठी होऊ शकतो', असं ते म्हणाले.
हेही वाचा :
- Gas Cylinder For ५०० Rs : 'इंडिया' आघाडी सत्तेत आल्यास मिळणार 'Good News'; 'या' नेत्याचं आश्वासन
- One Nation One Election : एक राष्ट्र-एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन