देहरादून- महंत नरेंद्र गिरीच्या मृत्यू प्रकरणातील महत्त्वाची बातमी आहे. महंत नरेंद्र गिरीच्या मृत्यू प्रकरणात आनंद गिरीला ताब्यात घेऊन सीबीआय हरिद्वारला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयची टीम ही श्यामपूरमधील आनंद गिरीच्या आश्रमात तपासणी करत आहे. सीबीआयची टीम सीसीटीव्ही फुटेजसहित आश्रमाची पूर्ण पाहणी करत आहे.
सात दिवस सीबीआयच्या कोठडीत राहिल्यानंतर आनंद गिरीने अनेक महत्त्वाचे खुलासे करण्याची शक्यता आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांना हरिद्वारमधून सतत फोन कोण करत होते? हे रहस्य आनंद गिरींना माहित होते का? कोणता प्रॉपर्टी डिलर हा आखाड्याची संपत्ती विकून कोट्याधीश होणार होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सीबीआय ही हरिद्वारला पोहोचली आहे.
संबंधित बातमी वाचा-आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरींचा संशयास्पद मृत्यू, शिष्यासोबतचा वाद आणि इतिहास; वाचा सविस्तर
आखाड्याच्या मालमत्ता विकून प्रॉपर्टी डीलर व्यावसियाकांची झाली चांदी
एक काळ असा होता की, आखाड्याची केवळ हरिद्वारमध्ये मालमत्ता होती. मात्र, हरिद्वारमध्ये विशाल काँक्रिटचे जंगल तयार झाले आहे. त्यामधील 50 टक्क्यांहून अधिक जमीन ही आखाड्याची आहे. त्यामधील निरंजनी आखाडा हा महत्त्वपूर्ण आहे. आखाड्याकडील मालमत्ता ही हळूहळू कमी झाली आहे. त्याचा सर्वाधिक फायदा हा हरिद्वारच्या प्रॉपर्टी डीलर व्यावसायिकांचा झाला होता.