नवी दिल्ली : काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदासह ऊर्जा मंत्रालयाची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. मात्र याबाबत काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
ऊर्जामंत्री नितीन राऊतही दिल्लीमध्ये..
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतही आज दिल्लीमध्ये आहेत. नाना पटोलेंची मागणी, आणि नितीन राऊत यांचा दिल्ली दौरा यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
पटोले गाझीपूर सीमेवर..
राहुल गांधींच्या भेटीनंतर नाना पटोले गाझीपूर सीमेवर जात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतील. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला आहे.