चमोली (उत्तराखंड): उत्तराखंडमधील चमोली येथे आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. अलकनंदा नदीच्या काठावर असलेल्या नमामि गंगे प्रकल्पाच्या सीवर ट्रीटमेंट प्लांटमध्ये मोठी दुर्घटना झाली. येथे काम करत असलेल्या 20ते 25 कामगारांना विजेचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. विजेचा झटका लागल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना पिपळकोटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी हजर झाले आहे. दरम्यान चमोली जिल्ह्याचे प्रभारी मंत्री धनसिंह रावत काही वेळात घटनास्थळी पोहोचत आहेत.
मृतदेह पाहण्यासाठी आलेल्या लोकांनाही विजेचा धक्का : चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर बांधण्यात आलेल्या नमामि गंगेच्या प्रकल्पाच्या बाजूला ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, अनेकांना विजेचा धक्का लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान चमोली पोलिसांनी सांगितले की, नदीच्या काठावर एक मृतदेह पडलेला होता. घटना पाहण्यासाठी अनेक लोक गेले होते. त्यांनाही विजेचा धक्का बसला. नदीच्या काठावर नमामि गंगे प्रकल्पांतर्गत काम सुरू असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे. येथे विजेचा धक्का लागून अनेक मजूर जखमीही झाले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी प्रकल्पस्थळी तिसऱ्या टप्प्यातील वीज खंडित झाल्याचे स्थानिक आमदार म्हणाले. हा टप्पा पुन्हा जोडताच विद्युत प्रवाह पसरला. वीज महामंडळावर गुन्हा दाखल करावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.