बेळगाव (कर्नाटक) : केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना काल बेळगावातून धमकीचा फोन आला होता. बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने गडकरींच्या मोबाईलवर फोन करून त्यांना जीवाची धमकी देत पैशांची मागणी केली, असे पोलिसांनी सांगितले. गडकरींनी ही बाब नागपूर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असून, नागपूर पोलिस काल आरोपींच्या शोधासाठी हिंडलगा कारागृहात आले आहेत. रविवारी दुसऱ्या दिवशीही शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
संशयित आरोपीची चौकशी सुरु : याप्रकरणी जयेश नावाच्या संशयित आरोपीची तुरुंग प्रशासनाच्या परवानगीने चौकशी करण्यात येत आहे. 2008 मध्ये आरोपी जयेश हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात होता. तपासादरम्यान त्याने कारागृहातून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले. नागपूर पोलीस सध्या तपास करत आहेत, अशी माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात : जयेश पुजारी 2008 मध्ये उप्पीनगडी पोलिस ठाण्यात खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. 12-08-2016 रोजी मंगळुरु 5व्या सत्र न्यायालयाने जयेश पुजारीला फाशीची शिक्षा सुनावली. 2017 मध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. तो मूळचा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कडबा तालुक्यातील शिराडी येथील रहिवासी आहे. 2018 मध्ये, त्याने उत्तर विभागाचे तत्कालीन आयजीपी आलोक कुमार यांना जीवघेणा कॉल केला आणि 1-5-2019 रोजी म्हैसूर तुरुंगात हलवण्यात आले. नंतर 14-09-2021 रोजी त्याला पुन्हा बेलगावी हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
कारागृहात तीन तास शोधमोहीम : कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव शहर पोलिसांनी नागपूर पोलिसांच्या सोबत आहेत. शनिवारी सायंकाळीही पोलिसांनी तीन तास कारागृहात शोधमोहीम राबवली. आरोपींचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले. धमकीचे फोन आल्यानंतर शनिवारी नितीन गडकरी यांचे महाराष्ट्रातील निवासस्थान आणि कार्यालयात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.