मुंबई :श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी (Nag Panchami the first festival of Shravan). श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते. तो दिवस नागपंचमी (Nagpanchami) म्हणून साजरा केला जातो. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. त्यामुळे नागपंचमीला शेतकरी शेतात पुजा (On Nag Panchami farmers worship in the fields) करतो. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे.
श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून, त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढतात. त्यानंतर त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.
'भावाला चिरंतन आयुष्य व अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही नागपंचमीचा उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे...
नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापैकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
तसेच दुसरी कथा : कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. शेतात देखील पीक संरक्षणात सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. शेतातील उंदरांचा नायनाट करुन, साप शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करीत असतो. त्यामुळे नागपंचमीला शेतकरी शेतात पुजा करतो. या दिवशी नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून, स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, वगैरे असे अनेक संकेत पाळले जातात.
नागपंचमीशी संबंधित काही कथा आणि श्रद्धा....
1. हिंदू पुराणानुसार, ब्रह्माजींचे पुत्र कश्यप ऋषी यांना चार बायका होत्या. त्याच्या पहिल्या पत्नीपासून देवता, दुसऱ्या पत्नीपासून गरुड आणि चौथ्या पत्नीपासून राक्षसांचा जन्म झाला असे मानले जाते. परंतु त्याची तिसरी पत्नी, कद्रू, जी नागा वंशाची होती, हिने नागांना जन्म दिला.
2. पुराणानुसार सापांचे दोन प्रकार सांगण्यात आले आहेत - दिव्य आणि भौम. दैवी नाग म्हणजे वासुकी आणि तक्षक इ. त्याचे वर्णन पृथ्वीचा वाहक आणि प्रज्वलित अग्नीसारखे तेजस्वी असे केले जाते. जर ते रागावले तर ते संपूर्ण जगाला हिसकावून आणि केवळ दृष्टीक्षेपाने जाळून टाकू शकतात. त्यांच्या चाव्यावर कोणतेही औषध दिलेले नाही. पण जे साप जमिनीवर जन्म घेतात, ज्यांच्या दाढांना विष आहे आणि जे माणसांना चावतात त्यांची संख्या ऐंशी आहे.
3. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापदम, शंखपाल आणि कुलिक - हे आठ सर्प सर्व सर्पांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. या नागांपैकी दोन ब्राह्मण, दोन क्षत्रिय, दोन वैश्य आणि दोन शूद्र आहेत. अनंता आणि कुलिक - ब्राह्मण; वासुकी आणि शंखपाल - क्षत्रिय; तक्षक आणि महापदम — वैश्य; आणि पदम आणि कर्कोटक हे शूद्र ,असे म्हणतात.
4. आख्यायिकेनुसार, जनमजेय, जो अर्जुनाचा नातू आणि परीक्षिताचा मुलगा होता. त्याने सापांचा बदला घेण्यासाठी आणि सर्पवंशाचा नाश करण्यासाठी एक सर्प यज्ञ केला होता. कारण त्यांचे वडील राजा परीक्षित यांचा तक्षक नावाच्या सर्पाच्या दंशामुळे मृत्यू झाला होता. नागांच्या रक्षणासाठी हा यज्ञ जरतकरूचा पुत्र आस्तिक मुनी यांनी बंद केला होता. ज्या दिवशी हा यज्ञ थांबला, तो दिवस श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी होती आणि तक्षक नाग आणि त्याचे बाकीचे वंशज नाशातून वाचले. येथूनच नागपंचमी उत्सव साजरा करण्याची परंपरा रूढ झाल्याचे मानले जाते.
नागपंचमी -2 ऑगस्ट 2022 :श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 2 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. अशा परिस्थितीत यंदा नागपंचमी 02 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे.
नाग पंचमी 2022 शुभ मुहूर्त पुढील प्रमाणे आहे....
नागपंचमी ची 02 ऑगस्ट 2022 ला सकाळी 5:13 पासून सुरुवात होणार आहे. तर, 03 ऑगस्टला सकाळी 05:41 वाजता संपन्ऩ होणार आहे.
या दिवशी नागपंचमी पूजेचा शुभ काळ- 02 ऑगस्ट सकाळी 5:43 ते 8.25 पर्यंत राहणार आहे.
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग आहे. या दिवशी प्रामुख्याने नागांची पूजा केली जाते.
नागपंचमी मुहूर्त...
1. श्रावण शुक्ल पंचमीला नागव्रत (नागपंचमी व्रत) केले जाते.
2. जर दुसऱ्या दिवशी पंचमी तीन मुहूर्तांपेक्षा कमी असेल आणि पहिल्या दिवशी ती चतुर्थीशी तीन मुहूर्तांपेक्षा कमी असेल, तर पहिल्या दिवशीच हे व्रत पाळले जाते.