नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी कृषी कायद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. यावर आज भाजपाचे राष्ट्रध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींचा एक जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. त्यासोबत, ये क्या जादू हो रहा है राहुलजी? असा प्रश्न नड्डा यांनी केला.
राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर ढोंगीपणाचा आरोप केला आहे. यापूर्वी तुम्ही जी भूमिका घेतली होती. तीच भूमिका आता का बदलत आहात, असा सवाल त्यांनी केला. देशाचे हित, शेतकऱ्यांचे हित, याबाबत तुम्हाला काही देणे-घेणे नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे. मात्र, येथून पुढे अशी ढोंगबाजी चालणार नाही. देशातील जनतेने तुमचा दुटप्पीपणा पाहिला आहे, असे नड्डा म्हणाले.
काय म्हणाले राहुल गांधी व्हिडिओमध्ये -
राहुल गांधी यांचा सभागृहातील एका भाषणाचा जूना व्हिडिओ आहे. यात ते एका मध्य प्रदेशातील एका शेतकऱयाच्या भेटीविषयी सांगत आहेत. मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होतो. तेव्हा मला एका शेतकऱ्यांने प्रश्न विचारला की, जे बटाट्याचं पीक आम्ही घेतो. ते बटाटा 2 रुपये किलोने विकतो. मात्र, त्याच बटाट्यापासून बनवणारे चिप्स विकत घेण्यासाठी आम्हाला 10 रुपये मोजावे लागतात. आमच्यात आणि कंपन्यांमध्ये थेट व्यवहार होत नसून दलालांमार्फत व्यवहार होतो. त्यामुळेच अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपला माल थेट कंपन्यांना विकता आला पाहिजे, दलालांचं वर्चस्व संपलं पाहिजे असं मत राहुल यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलं.