म्हैसूर -प्रियकरासोबत पर्यटनासाठी गेलेल्या मुंबई येथील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर असलेल्या म्हैसूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी या प्रकरणातील 5 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे तामिळनाडूतील रोजंदारी मजुरी करणारे आहेत, अशी माहिती डीजी-आयजीपी प्रवीण सूद यांनी दिली आहे.
तामिळनाडूतील पाच आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या सहा आरोपींपैकी पाच जणांना अटक -
म्हैसूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण सूद म्हणाले, "म्हैसूरमध्ये मुंबईतील विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 5 आरोपींना अटक केली आहे. अटक झालेले आरोपी हे तिरूपूर, तामिळनाडूचे रहिवासी आहेत. ते शहरात ड्रायव्हर सुतार आणि इतर रोजंदारी काम करतात, या आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. आतापर्यंत 6 पैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी अद्याप फरार आहे असे त्यांनी सांगितले.
फरार आरोपीवर 5 लाखांचे बक्षिस -
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे, की आरोपींनी पीडिता आणि तिच्या मित्राकडे 3 लाख रुपयांची मागणी केली होती. ते पैशाची जुळवाजुळव करू शकले नाही त्यावेळी त्यांनी पीडितेच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि पीडितेवर अत्याचार केला. पीडितेला अजूनही धक्का बसलेला आहे. आम्ही तिच्याकडून अधिक माहिती मिळवू शकलो नाहीत. आम्ही तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपींना अटक केली आहे आणि फरार आरोपीवर 5 लाखांचे बक्षिसही जाहीर केलेले आहे, असे प्रविण सूद यांनी सांगितले.
काय प्रकरण?
कर्नाटकातील बंगळुरुपासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर म्हैसूर आहे. म्हैसूर शहरापासून 13 कि.मी दूर असलेल्या चामुंडी टेकडीवर पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेली होती. दोघेजण एकातांत बसले होते. यावेळी आरोपींनी त्या दोघांचे मोबाइलवर खासगी क्षण चित्रित केले. आरोपी दोघांजवळ गेले आणि त्यांना व्हिडिओ दाखवत धमकावले. पीडिताकडे 3 लाख रुपयांची मागणी केली. संपूर्ण प्रकरणाने ते दोघेही घाबरले होते. आपल्या जीवासाठी त्यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र, 2 वाजेपर्यंत पैशांची जुळवाजुळव पीडित करू शकले नाही. यावर आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्यांनी तरुणाला दगडाने मारले. दोघांना मरणाअवस्थेत सोडून पीडितेचा मोबाइल घेत आरोपींनी पळ काढला होता.
हेही वाचा - मुंबईच्या विद्यार्थीनीवर म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्कार, वाचा कोण काय म्हणाले...