नवी दिल्ली - देशाचा शेतकरी छातीवर गोळी झेलण्यास तयार आहे. सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे आणि दिलगिरी व्यक्त करावी. सरकारने कायदे मागे घेतले तर काहीही बिघडणार नाही. सरकारने फक्त दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, असे भाकीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले. सरकारमधील काही लोक शेतकऱ्यांसोबत आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासारखे लोकही मोदी सरकारवर नाराज आहेत. आमचे खासदार घाबरलेले असून त्यांना शेतकर्यांबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, असे नरेश टिकैत म्हणाले.
भाजपाची हुकूमशाही चालणार नाही -
आमच्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत, असे टिकैत यांनी सांगितले. तसेच शेतकरी आंदोलन हे राजकीय नाही. मात्र, राजकीय पक्षांनी पुढे यावे. राजकीय पक्षांचे काम सरकारच्या चुकीच्या विरोधात आवाज उठवणे हे आहे. भाजपा राजकारण करीत असून त्यांची हुकूमशाही चालणार नाही, असे नरेश टिकैत म्हणाले.