नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांनी आज (सोमवार) देशाच्या १५व्या राष्ट्रपती ( President ) म्हणून शपथ घेतली. त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आणि राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी द्रौपदी मुर्मू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ( Former President Ramnath Kovind ), उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ( Vice President Venkaiah Naidu ), पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) आणि इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वतंत्र भारतातील पहिल्या राष्ट्रपती - "मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे, जिचा जन्म स्वतंत्र भारतात झाला आहे. स्वतंत्र भारतातील नागरिकांसह आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नांना गती दिली पाहिजे. माझा जन्म ओडिशातील एका आदिवासी गावात झाला. अतिशय दुर्गम भागातील मी असले तरी देशाच्या लोकशाहीची ताकद मला इथपर्यंत घेऊन आली आहे.
अनोखा योगायोग - "आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा महत्त्वाच्या काळात देशाने माझी राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे. आजपासून काही दिवसांनी देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. योगायोग असा की, जेव्हा देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरे करत होता, तेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि आज स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात मला ही नवी जबाबदारी मिळाली आहे, असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.