नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाची निवडणूक ( DROUPADI MURMU WINS) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी जिंकली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 4754 मते पडली, त्यापैकी द्रौपदी मुर्मू यांना 2824 प्रथम पसंतीची मते मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना 1,877 मते मिळाली. 53 मते अवैध ठरविण्यात आली. दुसरीकडे, लोकसभा आणि राज्यसभेबद्दल बोलायचे झाल्यास, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना लोकसभा आणि राज्यसभेतून 540 मते मिळाली, तर यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली. अशा स्थितीत द्रौपदी मुर्मूच्या बाजूने किती खासदारांनी क्रॉस व्होट केले याचा अंदाज लावला जाऊ शकतो. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती ( President Droupadi Murmu ) पदाच्या निवडणुकीत प्रचडं बहुमताने विजयी झाल्याने मोदी-शहा यांची देशाच्या राजकारणातील ताकद पुन्हा दिसून आली आहे.
लोकसभेत मुर्मू यांच्या बाजूने संख्याबळ असे होते - भाजप-३०३, बसपा-१०, बीजेडी-१२, जेडीयू-१६, एआयएडीएमके-१, जेएमएम-१, डीपी-३, शिवसेना-१९, वायएसआर काँग्रेस-२२ , एलजेपी-6, शिरोमणी अकाली दल (बादल)-2, अपना दल-2. म्हणजेच एकूण ही संख्या ३९७ आहे. आता राज्यसभेत ही ताकद किती आहे ते पाहू. राज्यसभेत भाजपच्या 91 सदस्यांव्यतिरिक्त , 5 सदस्य जेडीयु, 9 बीजेडी, 4 एआयडीएमक आणि एक खासदार बसपचा आहे. याशिवाय द्रौपदी मुर्मू यांना राज्यसभेतील एकूण 117 खासदारांचा पाठिंबा होता, म्हणजे जेएमएमचे 2, टीडीपीचे 1, आरपीआयचे एक आणि शिवसेनेचे तीन खासदार. आता लोकसभेतील 397 आणि राज्यसभेतील 117 सदस्यांची मते एकत्र केली तर ही संख्या 514 होईल.