तंजावुर (तमिलनाडु) - येथे आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोप नवविवाहितांच्या नातेवाईकांवर आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तंजावरचे पोलीस अधीक्षक जी रावल्ली प्रिया यांनी सांगितले की, नवविवाहित जोडप्याच्या नातेवाइकांनी त्यांच्या जातीबाहेरचे लग्न केल्यामुळे त्यांचा खून केला.
सूत्रांनी सांगितले की, जेव्हा वधूची आई आपल्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून घराबाहेर आली तेव्हा तिला 24 वर्षीय एस. सरन्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तर, दुसरीकडे तिचा नवराही अशाच अवस्थेत मृतावस्थेत सापडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासातून समोर आले आहे की, चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या सरन्या तिरुवन्नमलाईजवळील पोन्नूर येथील व्ही मोहन (३१) याच्या प्रेमात पडली होती. मोहन दुसऱ्या जातीचा होता. काही दिवसांपूर्वी या प्रेमी युगुलाचे लग्न झाले होते.