मुंबई:आयपीएलचा पंधरावा हंगाम ( Fifteenth season of IPL ) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच आता मुंबईतील वानखेडे स्टेडियम उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ माजली होती. मात्र मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढून अशाप्रकारे कुठलीही धमकी मिळाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांनी देखील सोशल मीडियावर ट्विट करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. तसेच यावर कुणीही विश्वास ठेवू नका असे देखील म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलवर कोणत्याही प्रकारचे दहशतवाद्यी सावट नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आयपीएलबाबत कोणतीही धमकी मिळाली नसून, कोणत्याच दहशतवाद्यांनी ट्रायडेंट किंवा वानखेडेची रेकी केली नाही, असंही त्यांनी म्हटले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळवले जाणार आहेत. आयपीएल ही स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, अशी माहिती समोर आली होती. यानंतर क्रिकेटविश्वात एकच खळबळ माजली. परंतु, अतिरेक्यांकडून हॉटेल ट्रायडेंट, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडेंटच ते वानखेडे स्टेडियमपर्यंतच्या मार्गाची रेकी झाल्याबाबत सध्या कोणत्याही संस्थेकडून इनपूट किंवा माहिती प्राप्त झालेली नाहीये, असं मुंबई पोलिसांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.