मुंबई: पाकिस्तानमधून भारतात लपून आलेली सीमा हैदर ही तिच्या भारतीय तरुणाबरोबरील विवाहामुळे चर्चेत आली आहे. तिने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला आहे. तिच्या भारतामधील वास्तव्याबाबत संशय व्यक्त होत आहे. अशातच एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, अन्यथा मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करणार असल्याचा इशारा अज्ञात व्यक्तीने दिला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार मुंबई नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणारा अज्ञात व्यक्ती हा उर्दू भाषेत बोलणारा होता. मुंबईवर परत हल्ला झाल्यास त्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल, असेही अज्ञात कॉलरने म्हटले आहे. या कॉलनंतर मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. त्यासाठी गुन्हे शाखेचे पथकही मदत करत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार धमकीचा कॉल हा अॅपद्वारे करण्यात आला आहे. त्यावरून पोलीस कॉलरच्या आयपीवरून शोध घेत आहेत.
कोण आहे सीमा हैदर ? पब्जीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कराची येथील सीमा हैदरची ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथील रहिवासी असलेल्या सचिनशी ओळख झाली. दोघेही नेपाळमध्ये लग्न केले. सीमा हैदर ही चार मुलांसह नेपाळमधून अवैध मार्गाने भारतात पोहोचली. दोघेही भारतात लग्न करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली. न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली आहे. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांनी सीमा हैदर ही देशासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. तिला भारतात पाठविण्याचा दहशतवाद्यांचा डाव असू शकतो. त्यामुळे भारत सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी रझवी यांनी मागणी केली आहे.