मुंबई - हनिमून म्हणजेच मधूचंद्र. हा वेळ म्हणजे आराम करण्याचा वेळ. लग्नाच्या धावपळीनंतर निवांत काही क्षण आपल्या जोडीदाराबरोबर घालवत आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी हनिमून हवाच असं म्हटलं जातं. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासाठी नवविवाहित दाम्पत्य आपल्या आवडत्या ठिकाणी जातात. असेच एक मुंबईतील नवविवाहित जोडपं हनिमूनसाठी कतारला गेले होते. मात्र, या हनिमूनने त्यांचे अख्खं आयुष्य बदलून टाकलं. कतार विमानतळावर तपासणीत या दाम्पत्याजवळील बॅगमध्ये 4 किलो अमली पदार्थ आढळल्याने दोघांनाही अटक झाली. या गुन्ह्यात दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी जोडप्यांच्या कुटुबीयांकडून तक्रार दाखल झाल्यानंतर एनसीबीने चौकशी करून दोघांची सुटका केली आहे. या जोडप्याने दोन वर्ष तरुंगात घालवली आहेत. आज ते मुंबईत परतले.
एनसीबीचे विभागीय संचालक (अतिरिक्त शुल्क), के.पी.एस. मल्होत्रा यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 6 जुलै 2019 रोजी मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्यांची पत्नी ओनिबा कौसर हनीमूनसाठी कतारला गेले होते. दोहाच्या हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये अमली पदार्थ आढळले. तेथील पोलिसांनी अमली पदार्थ ताब्यात घेत त्यांना अटक केली. त्यांच्या बॅगमधून एकूण 4.1 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. त्यांच्यावर कतारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कतारमधील कोर्टाने या दोघांना 10 वर्षाच्या कारवासाची शिक्षा ठोठावली.
नेमकं काय घडलं?
27 सप्टेंबर रोजी ओनिबा कौसरचे वडील शकील अहमद कुरेशी यांनी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडे (एनसीबी) तक्रार दाखल केली. आपली मुलगी व जावई निर्दोष असून त्यांना फसवण्यात आले आहे. या मागे नातेवाईक रियाझ कुरेशी आणि निजाम कारा यांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बसुम रियाज कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा या दोघांनी हे हनिमून टूर पॅकेज भेट म्हणून दिले होते. या दोघांनी एका बॅगेत अमली पदार्थ लपवले होते. मात्र, या पॅकेटबद्दल त्यांना विचारले असता, कतारमधील माझ्या मित्राला एक तंबाखू हवी आहे. ती तेवढी तिकडे गेल्यावर दे, असे शकील यांना तब्बसुम हिने सांगितले होते. या संदर्भात तबस्सुम व निजाम कारा या दोघांच्या विरोधात शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे तक्रार दाखल केली. पुरावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि काही ऑडिओ क्लिप्स एनसीबीकडे सुपूर्द केली.
आरोपींचा पर्दाफाश -