बडोदा(गुजरात) - भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद दरम्यान प्रवास जलद व्हावा यासाठी केंद्र सरकारने बुलेट ट्रेनचा ड्रीम प्रोजेक्ट राबवला आहे. बडोदा बुलेट ट्रेन मार्गावरील जमीन भूसंपादनाची कामे सध्या पूर्ण झाली आहेत. तसेच येथील स्टेशनवर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तब्बल 12 बुलेट ट्रेन स्टेशन्स बांधली जाणार आहेत. त्यातील बडोदा हे व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन असणार आहे. बडोदा स्टेशन भागातील बुलेट ट्रेनच्या कामाची 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी ग्राऊंडवर जाऊन पाहणी केली असता, तेथे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे.
काम कुठपर्यंत आले? - गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा मार्ग अनेक नद्यांमधून जाणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने माहिती दिली आहे की, गुजरातमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 352 किमी मार्गावर 100 किमी पेक्षा जास्त क्षेत्रात बुलेट ट्रेन मार्गाच्या पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, मुख्यतः खेडा, आणंद, वडोदरा, भरुचमध्ये काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नवसारीजवळ ९.२ किमीच्या व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. सध्या गुजरातमधील 8 जिल्ह्यांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. साबरमती, माही, तापी, नर्मदा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. बडोदा शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अजूनही बुलेट ट्रेनचे अत्यल्प काम असले तरी बडोदापूर्वी आनंद परिसरात बुलेट ट्रेनच्या पिलरचे काम सुरू आहे.