नवी दिल्ली : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे गुजरातमधील काम सध्या जोरात सुरू आहे. गुजरात राज्यातील महत्त्वाचे शहर म्हणून सुरतकडे पाहिले जाते. याच सुरतमधून आता बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार आहे. सुरत बुलेट ट्रेन स्टेशनचे काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. याठिकाणी पिलर टाकण्याचे काम चालू आहे. या मार्गावर एकूण 16 पिलर सध्या टाकले आहेत.
बुलेट ट्रेनचे काम वेगात - गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. वलसाड जिल्ह्यातील पार नदीवर बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत पहिला नदी पूल तयार होत असल्याची MAHSR कडून नुकतीच माहिती देण्यात आली आहे. या नदीची रुंदी 320 मीटर आहे. यात 8 फुल स्पॅन गर्डर आहेत. खांबांची उंची 14.9 ते 20.9 मीटर आहे. गोलाकार खांब 4-5 मीटर व्यासाचे आहेत. नर्मदा, ताप्ती, माही, साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पूल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे.
50 मीटरचा पहिला रेल्वे लेव्हल स्लॅब : गुजरात आणि DNH मधील 8 जिल्ह्यांमधून जाणार्या संपूर्ण 352 किमी प्रकल्पासाठी व्हायाडक्ट, पूल, स्टेशन आणि ट्रॅकच्या बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. सध्या बांधकाम जोरात सुरू झाले आहे. सुरत आणि आनंद एचएसआर स्टेशनवर प्रत्येकी ५० मीटरचा पहिला ट्रक स्तर स्लॅब टाकण्यात आला आहे.
का महत्त्वाचे आहे स्टेशन : 2026 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू होणार असल्याचे टार्गेट आहे. सर्व प्रथम, गुजरात विभागात सुरत-बिलीमोरा लाइन सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तोपर्यंत काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी पहिली बुलेट ट्रेनची चाचणी सुरत ते बेलीमोरा पर्यंत घेण्यात येणार आहे. 350 किलोमीटर प्रति तास वेगाने या बुलेट ट्रेनची चाचणी केली जाणार आहे.
स्टेशनची माहिती : सुरत हे शहर उद्योगांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीने सुरत बुलेट ट्रेन स्टेशन महत्त्वाचे ठरणार आहे. आर्सेलर मित्तलची शाखा असलेल्या AMNS इंडियाकडून बुलेट ट्रेनसाठी चांगल्या दर्जाचे स्टील पुरविले जाणार आहे. एमएमएस इंडियाचे अध्यक्ष लक्ष्मी मित्तल यांनी सूरतमध्ये याची घोषणा केली होती. त्यामुळे सुरतमधूनच बुलेट ट्रेन प्रकल्पांना स्टीलचा पुरवठा केला जाणार आहे.