लखनौ: समाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. (mulayam singh yadav health). मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यादव यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना युरिन इन्फेक्शन आणि रक्तदाबाचा त्रास आहे. (mulayam singh yadav in icu).
यादव कुटुंब दिल्लीला रवाना: मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पत्नी डिंपल व मुलगा अर्जुनसह दिल्लीला रवाना झाले आहेत. मुलायम यांचे धाकटे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम यांची धाकटी सून अपर्णा यादवही दिल्लीत पोहोचल्या आहेत. याशिवाय कुटुंबातील इतर सदस्य त्यांचे मूळ गाव सैफई हून गुरुग्रामला पोहोचले आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी केली विचारपूस: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी मेदांता हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांशी बोलून मुलायमसिंह यादव यांच्यावर उत्कृष्ट उपचार करण्यास सांगितले आहे. मुलायमसिंह यादव यांच्यावर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
मुलायमसिंहासाठी देशभरातून प्रार्थना: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलायमसिंहांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धार्मिक नगरी काशीमध्ये समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते शक्तीपठण करून नेताजींच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. वाराणसीमध्ये बाबासाहेब आंबेडकर वाहिनीच्या बॅनरखाली समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदिशक्तीपाठ हवन केले. आंबेडकर वाहिनीचे सरचिटणीस सत्य प्रकाश सोनकर म्हणाले की, मुलायमसिंह यादव हे आमचे पालक आहेत. त्याची तब्येत बिघडल्याचे आम्हा सर्वांना कळताच आम्ही ताबडतोब शक्तीचे पठण आणि हवन केले.
आरोग्याची लढाई जिंकणारंच - सपा कार्यकर्ते:सपा कार्यकर्त्यांनी सांगितले की, या पूजेच्या माध्यमातून नेताजी लवकर बरे व्हावेत आणि आम्हा सर्वांना पुन्हा मार्गदर्शन करावे, अशी आमची इच्छा आहे. ते एक जनसामान्य नेते म्हणून ओळखले जातात आणि आरोग्याची लढाई जिंकून लवकरच ते आपल्या सर्वांमध्ये हजर होतील अशी आम्हाला आशा आहे.