कोलकाता - काही दिवसापूर्वी पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली. राज्यात राजकीय घडामोडींनी वातावरण गरम आहे. शुक्रवारी भाजपा नेते मुकुल रॉय यांनी आपला मुलगा शुभ्रांशु रॉय यांच्यासह पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये घरवापसी झाल्यार आज टीएमसी नेते मुकुल रॉय यांना पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून झेड प्रवर्गाची सुरक्षा मिळाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून सुरक्षा मिळाल्यानंतर मुकुल रॉय यांनी केंद्रीय सुरक्षा मागे घेण्याबाबत गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. केंद्राने या विनंतीला प्रतिसाद दिला आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. मुकुल रॉय यांच्यासह त्यांच्या मुलालाही राज्य सरकारकडून वाय श्रेणी सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे.
मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017 मध्ये तृणमूलला रामराम ठोकला होता. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यात मुकुल रॉय यांनी मोठी कामगिरी पार पाडली. मात्र, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपुर्वी टीएमसीचे सुवेंदू अधिकारी यांना भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाचे वर्तुळ सुवेंदूभोवती फिरू लागल्याने मुकुल रॉय दुर्लक्षीत झाले. अखेर मुकुल रॉय यांनी निर्णय घेत, भाजपाला रामराम ठोकला.