लखनऊ : उत्तर प्रदेशचा आमदार आणि गुंड मुख्तार अन्सारीला राज्यात परत आणण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक पंजाबला पोहोचले आहे. पहाटे चारच्या सुमारास बांदा पोलिसांचे पथक रुपनगरला पोहोचले. याठिकाणी असलेल्या रोपड तुरुंगात मुख्तार कैद आहे. त्याला बांदा तुरुंगात हलवण्यात येणार आहे.
यूपी पोलिसांचे 'स्पेशल १००'..
मुख्तारला नेण्यासाठी वाहनांच्या एका ताफ्यासह रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. पोलिसांनी त्याला परत आणण्यासाठी 'प्लॅन ए' आणि 'प्लॅन बी' अशा दोन योजना तयार केल्या आहेत. पंजाबला १०० पोलिसांचे एक विशेष पथक पोहोचले आहे. यामध्ये दोन पोलीस उपअधीक्षक, एक सीओ, दोन पोलीस निरीक्षक, सहा पोलीस अधिकारी, २० हेड कॉन्स्टेबल आणि २० कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. यासोबतच बांदा पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन पथकही यात सहभागी आहे. या सर्वांकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. वाहनांच्या ताफ्यामध्ये छोटे वज्र वाहन, बोलेरो गाडी आणि सात निळ्या पोलीस गाड्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या पथकासोबतच एक वैद्यकीय पथकही पाठवण्यात आले आहे.