गुवाहाटी - मणिपूरमध्ये रेल्वेमार्ग बांधकाम साइटवर मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. यामध्ये किमान 16 जण मृत्युमुखी पडलेत. तसेच चिखलामध्ये सुमारे 70 बेपत्ता लोकांचा शोध रात्रभर सुरू होता. क्लिअरिंग ऑपरेशन पुन्हा सुरू केल्यावर बचावकर्त्यांना दोन मृतदेह सापडले. अधिकार्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
मदतकार्यात अडचणी - मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळजवळील नोनी या गावातील ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक आपत्ती निवारण कर्मचारी आणि पोलिस बुलडोझरसारखी उपकरणे वापरत आहेत. परंतु भुसभुशीत जमिनीमुळे जड उपकरणे हलविणे कठीण होत आहे. या ठिकाणी अधूनमधून पाऊस सुरू आहे. रेल्वेरोड प्रकल्पाच्या परिसरात एक टेकडीच कोसळल्याने आतापर्यंत सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, असे अधिकारी गिते यांनी सांगितले.
टेकडी नदीत कोसळल्याने धरण - या ठिकाणी मातीचा ढिगारा नदीत पडल्याने परिसरात धरणासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे. मृतांपैकी सात टेरिटोरियल आर्मीचे सदस्य आहेत, असे राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी सांगितले. ते म्हणाले की बेपत्ता झालेल्यांमध्ये भारतीय रेल्वेचे पाच अधिकारी होते. कारण या भागात बंडखोरांचा वावर असल्याने लष्कराचे कर्मचारी तेथे रेल्वे अधिकार्यांना सुरक्षा पुरवत होते.