नवी दिल्ली MS Dhoni case : क्रिकेटपटू एमएस धोनीनं दाखल केलेल्या अवमान याचिकेत मद्रास उच्च न्यायालयानं शुक्रवारी आयपीएस अधिकारी संपत कुमारला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसंच न्यायमूर्ती एस एस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठानं कुमारला अपील दाखल करण्याची परवानगी देण्यासाठी तीस दिवसांसाठी शिक्षेला स्थगिती दिली. कथित दुर्भावनापूर्ण विधानं आणि बातम्यांवरुन धोनीनं एका वृत्तवाहिनी व इतरांविरुद्ध उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. ज्यात तो 2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यांच्या सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करण्यात आला होता.
काय होता आरोप : भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारानं आयपीएल सट्टेबाजी घोटाळ्याची सुरुवातीला चौकशी करणाऱ्यांसह प्रतिवादींना, या प्रकरणाशी संबंधित त्याच्याविरुद्ध बदनामीकारक विधानं करण्यापासून किंवा प्रकाशित करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. उच्च न्यायालयानं यापूर्वी अंतरिम मनाई आदेश दिले होते आणि संबंधित वृत्तवाहिनीला इतरांना धोनीविरोधात बदनामीकारक विधानं करण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर वृत्तवाहिनी आणि इतरांनी मानहानीच्या दाव्याला उत्तर म्हणून त्यांचं लेखी निवेदन दाखल केलं होतं. लेखी विधानांनंतर धोनीनं अर्ज दाखल केला आणि दावा केला की, त्यांनी आपल्या लेखी युक्तिवादांमध्ये अधिक बदनामीकारक विधानं केली आहेत. त्यामुळं यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. एमएस धोनीचे वकील पीआर रमन यांनी न्यायालयात बाजू मांडली.