Mr. Beast puts the first video on X :यूट्यूबवर वर्चस्व गाजवलेल्या मिस्टर बीस्ट (MrBeast) यांनी आज सर्वांनाच आश्चर्यचकित केलंय. यापूर्वी एलॉन मस्क यांना प्रत्युत्तर देताना, डोनाल्डसन उर्फ मिस्टर बीस्ट म्हणाले होते की, “माझ्या व्हिडिओंना बनवण्यासाठी लाखो खर्च येतो. जरी त्यांना एक्सवर अब्जावधी व्ह्यूज मिळाले असले तरी हवा तेवढा नफा मिळणार नाही." तसंच या प्लॅटफॉर्मची चाचणी घेण्यास मी तयार असल्याचंही ते म्हणाले होते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर त्यांनी आता एक्सवर आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला आहे. तसंच या व्हिडिओला किती जाहिराती मिळतील हे पुढच्या आठवड्यात शेअर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पोस्टमध्ये काय म्हणालेत मिस्टर बीस्ट : "$1 कार विरुद्ध $100,000,000 कार!!!" असं शीर्षक देत ते म्हणालेत की, “एक्सवरील व्हिडिओ जाहिरातीतून किती कमाई करेल याची मला उत्सुकता आहे. म्हणून मी त्याची चाचणी घेण्यासाठी व्हिडिओ अपलोड करतोय. पुढील आठवड्यात जाहिरात रिव्हेन्यू शेअर करीन." मिस्टर बीस्ट यांनी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही तासांमध्येच या व्हिडिओला 20 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
- एक्सवर व्हिडिओ अपलोड करणार नाही :काही दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी मिस्टर बीस्टला मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ अपलोड करण्याचा सल्ला दिला. मात्र, मिस्टर बीस्ट यांनी यासाठी नकार दिला होता. असं असतांनाच आता मिस्टर बीस्ट यांनी एक्सवर व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामुळं अनेकांच्या आश्चर्यानं भुवया उंचावल्या आहेत.