नवी दिल्ली: मागील तीन महिन्यापासून मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचाराच्या घटनांवरुन केंद्रातील सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत. केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधीपक्षाची टीम 'इंडिया' मणिपूर दौरा करणार आहे. विरोधकांच्या 'इंडिया' या आघाडीच्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ तेथील हिंसाचारग्रस्त भाग आणि मदत केंद्रावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत भाष्य करावे, अशी मागणी विरोधी पक्षाने लावून धरली आहे.
16 घटक पक्षांचा मणिपूर दौरा : मणिपूर हिंसाचारावर विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. विरोधकांनी संसदेतील दोन्ही सभागृहात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरला आहे. मणिपूरच्या घटनेवरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी असलेल्या 'इंडिया'चे एक शिष्टमंडळ दोन दिवसाचा मणिपूर दौरा करणार आहे. या दौऱ्यावरुन परतल्यानंतर खासदार सोमवारी सभागृहाला परिस्थितीची माहिती देणार आहेत. शिष्टमंडळात 16 घटक पक्षांचे 21 खासदार आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हेदेखील या शिष्टमंडळात आहेत.
विरोधी पक्षाचे खासदार रवाना :
इंडिया आघाडीचे खासदार दिल्ली विमानतळावरून मणिपूरला रवाना झाले आहेत. आघाडीचे 21 खासदार आज इम्फाळला जाणार आहेत.
हे खासदार आहेत मणिपूर दौऱ्यात: मिळालेल्या माहितीनुसार, खासदार मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागातील स्थानिक नागरिकांशी बोलून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मणिपूर दौऱ्यावर गेलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे गौरव गोगोई आणि फुलोदेवी नेताम, राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि जनता दल युनायटेडचे अनिल हेगडे, यांचा समावेश आहे. तृणमूल काँग्रेसच्या सुष्मिता देव, झारखंड मुक्ती मोर्चाच्या महुआ माझी, द्रमुकच्या कनिमोझी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पीपी मोहम्मद फैजल, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन आणि वीसीके पक्षाचे थिरुमावलवन यांचाही यात सहभाग आहे. याशिवाय शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) अरविंद सावंत, सीपीआयचे संतोष कुमार, माकपचे ए ए रहीम, समाजवादी पक्षाचे जवाद अली खान, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, डीएमकेचे डी रवी कुमार आणि आययूएमएलचे ईटी मोहम्मद बशीर यांचाही देखील या शिष्टमंडळात सहभाग असेल.
मणिपूर मुद्द्यावर विरोधक आक्रमक :
अरविंद सावंत -