भोपाळ : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका रुग्णाला दिला जात असलेला ऑक्सिजन काढून दुसरीकडे नेल्यामुळे त्या रुग्माचा मृत्यू झाला. याबाबत रुग्णालयाच्या अधीक्षकांना जाब विचारला असता त्यांनी ऑक्सिजन काढल्याच्या गोष्टीचे खंडन केले. मात्र, सीसीटीव्हीमध्ये वॉर्डबॉय ऑक्सिजन काढताना दिसून आल्याचे लक्षात येताच, त्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता नव्हती असे अधीक्षकांनी म्हटले.
वॉर्डबॉयने ऑक्सिजन हटवल्याचे सीसीव्हीत समोर..
पिछोर जिल्ह्यातील दुर्गापूरचे रहिवासी सुरेंद्र शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा ऑक्सिजन काढल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अगोदर ऑक्सिजन काढला नसल्याचे म्हणत सुरेंद्र यांच्या मृत्यूसाठी दुसरी कारणे पुढे केली. यानंतर कुटुंबीयांनी गदारोळ करत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. यानंतर सीसीटीव्ही तपासले असता, वॉर्डबॉयने सुरेंद्र यांचा ऑक्सिजन सिलेंडर काढून दुसऱ्या रुग्णाला लावल्याचे स्पष्टपणे दिसून आले. यानंतरच त्यांचा तडफडून मृत्यू झाला.
रुग्णाला ऑक्सिजनची गरजच नव्हती; अधीक्षकांची सारवासारव..
यानंतर ऑक्सिजन काढल्याबाबत जाब विचारला असता, त्या रुग्णाला अतिरिक्त ऑक्सिजनची गरजच नव्हती अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न रुग्णालयाच्या अधीक्षकांनी केला. त्यामुळेच त्या रुग्णाचा ऑक्सिजन सिलिंडर दुसऱ्या रुग्णाला लावल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जर या रुग्णाला गरज नव्हती, तर आधी सिलिंडर काढला नसल्याचे का सांगितले? तसेच, सुरेंद्र यांचा अचानक कसा मृत्यू झाला हे प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. यानंतर अखेर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अक्षय निगम यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.