सीधी (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील सीधी येथे एका अनियंत्रित ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. मोहनिया बोगद्याजवळ ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या 50 पेक्षा अधिक आहे, तर 12 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीसाठी गेली होती. तेथून परतत असताना एका भरधाव ट्रकने तिला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बस जागीच पलटी झाली.
असा झाला अपघात : सतना जिल्ह्यात आयोजित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सीधीहून अनेक जण आले होते. कार्यक्रम संपताच प्रवाशांना घेऊन आलेल्या बस सतनाहून परतत होत्या. बस सीधी जिल्ह्यातील मोहनिया बोगद्याजवळ पोहोचताच प्रवाशांना नाश्त्यासाठी बसेस थांबवण्यात आल्या. त्याचवेळी रेवाकडून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटला, आणि ट्रकचे नियंत्रण सुटले. तो ट्रक बोगद्याजवळ उभ्या असलेल्या बसवर जाऊन धडकला. या धडकेमुळे तिथे उभ्या असलेल्या 3 बस एकामागून एक एकमेकांवर आदळल्या. अपघातानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावातील लोकही घटनास्थळी जमा होत ते मदतकार्यात शामिल झाले. जखमींमध्ये सर्व प्रौढ आहेत.
मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले :घटनेनंतर लगेचच, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विष्णू दत्त शर्मा मृतांची स्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी येथे मदत कार्याबाबत निर्देश दिले. यानंतर ते दोघे जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी संजय गांधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर केली आहे.