नवी दिल्ली -संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना आणखी आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत, राजकीय अजेंडांसाठी केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर आणि या एजन्सींच्या माध्यमातून विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी ताब्यात घेतल्याबद्दल कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली आहे. राऊत यांना अटक झाल्यानंतर आज संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होताच. गदारोळ सुरू झाला. त्यानंतर तासाभरासाठी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.
खर्गे यांचीही भाजपवर टीका : भाजपला 'विरोधकमुक्त' संसद हवी आहे. म्हणूनच संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. महागाई, गुजरात दारूकांडाची शोकांतिका हे मुद्दे आम्ही संसदेत मांडू राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संसदेत राज्यसभेत आज या विषयावरुन गदारोळ होईल हीच शक्यता जास्त आहे.
शशी थरूर यांचीही चर्चेची मागणी:लोकसभेत महागाईवर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. त्यासाठी वेळ दिला पाहिजे. हा विषय मोठा आहे. लोकांच्या जवळचा आहे. त्यामुळे यासंदर्भात संसदेत चर्चा ही झालीच पाहिजे. असे खा. शशी थरुर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. पावसाळी अधिवेशनातील आमच्या चार खासदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असेही काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणालेत.
राऊत यांची आज न्यायालयात हजेरी :पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी सेना नेते खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांनी नऊ तास चौकशी केली. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात सायंकाळी नेले. तेथेही तब्बल सहा तास चौकशी केल्यावर रात्री उशिरा 12 वाजून 30 मिनिटांनी त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ही अटक आजच्या तारखेला 1 ऑगस्ट 2022 रोजी झाली. आज सकाळी 9:30 वाजता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut medical check up ) यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची ( Sanjay Raut PMLA court ) सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीकडून न्यायालयात केली जाण्याची शक्यता आहे.