भोपाळ : राजधानी भोपाळमध्ये आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव तसेच उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवरा यांना शपथ दिली. आज झालेल्या या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. कार्यक्रमाला सुमारे 10 हजार लोक उपस्थित होते.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था : या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपच्या अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्यानं यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल स्टेडियमवर सुरक्षेची सर्व तयारी करण्यात आली होती. एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी भोपाळ गाठून तयारीची पाहणी केली होती.
मोतीलाल स्टेडियममध्ये बांधण्यात आले 3 हेलिपॅड : मोतीलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेरील लाल परेड मैदानावर तीन स्वतंत्र हेलिपॅड बांधण्यात आले होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानानं भोपाळ विमानतळावर पोहोचले. त्यानंतर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं लाल परेड मैदानावर पोहोचले होते. येथे व्हीव्हीआयपी वाहनेही सज्ज ठेवण्यात आली होती. याशिवाय महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी चोवीस तास परिश्रम घेऊन स्टेडियम नववधूप्रमाणे सजवलं होतं. यासोबतच इतर जिल्ह्यांतूनही काही अतिरिक्त फौजा मागवण्यात आल्या होत्या.