मंदसौर (मध्य प्रदेश) MP Crime News : राजस्थान आणि मध्य प्रदेशात सध्या निवडणुकीची धूम आहे. येथे पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू असून पोलीस प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
ट्रकचं महाराष्ट्र कनेक्शन : या पार्श्वभूमीवर, मध्य प्रदेशच्या मंदसौर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या भानपुरा येथून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. आपल्या नियमित तपासणी दरम्यान पोलिसांनी राजस्थानमार्गे मध्य प्रदेशात प्रवेश करणाऱ्या ट्रकमधून डिटोनेटर्सचे ४०० बॉक्स आणि फ्यूज बॉक्स जप्त केले. विशेष म्हणजे, हा ट्रक आणि या प्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील रहिवासी आहेत.
दोन आरोपींना अटक : या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील नंदू राव आणि अकोल्यातील शुभम कोकणे यांना अटक करण्यात आली. या जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे ३२ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा माल राजस्थानमधून मध्य प्रदेशात येण्याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. पोलिसांच्या पथकानं आता दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.