भोपाळ :वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन करण्यासाठी चढलेल्या एका प्रवाशाला ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन करण्याचा तब्बल 6 हजार रुपये भुर्दंड मोजावा लागला आहे. ही घटना भोपाळच्या रेल्वेस्थानकात घडली आहे. अब्दुल कादिर असे वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन केल्यामुळे भुर्दंड बसलेल्या प्रवाशाचे नाव आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जन केल्याने प्रवाशाला 6 हजार रुपयाचा चुना लागल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण :अब्दुल कादिर हे सिंगरौलीच्या बैधन येथे राहतात. ते कुटुंबीयांसोबत भोपाळला आले होते. मात्र ते मूत्र विसर्जन करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढले. 15 जुलै रोजी ते कुटुंबासह भोपाळला आले होते. सिंगरौलीला परत जाण्यासाठी भोपाळ रेल्वे स्थानकावर दक्षिण एक्सप्रेसची वाट पाहत होते. इंदूरला जाण्यासाठी वंदे भारत ट्रेनही फलाटावर उभी होती. यादरम्यान अब्दुल कादिर हे मूत्र विसर्जन करण्यास स्टेशनवरील बाथरूममध्ये न जाता वंदे भारत ट्रेनमध्ये गेले. अब्दुल कादिर बाथरुममध्ये जाताच ट्रेनचे गेट बंद झाले. ट्रेनचे गेट आपोआप बंद होतात, हे त्यांना माहीत नव्हते. गेट न उघडल्याने अब्दुल कादिर प्रचंड घाबरले. त्यामुळे त्यांनी टीटी आणि पोलिसांकडे मदत मागितली. मात्र पोलिसांनी आणि टीटींनी त्यांना मदत करण्याऐवजी 1 हजार 20 रुपयांचा दंड ठोठावला. ट्रेन उज्जैनला जात असल्याने त्यांना उज्जैनचे 1020 रुपयांचे तिकीट काढावे लागले.