नवी दिल्ली MP Assembly Election : गेल्या सहा महिन्यांत भाजपाचे 40 हून अधिक वरिष्ठ नेते कॉंग्रसमध्ये सामील झाले आहेत. यामुळे मध्य प्रदेशात कॉंग्रेस पुनरागमनाच्या मार्गावर असल्याचा दावा मध्य प्रदेश कॉंग्रेसचे प्रभारी सचिव सी पी मित्तल यांनी केलाय. मध्यप्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत.
40 हून अधिक भाजप नेते कॉंग्रेसमध्ये :भोपाळमधील विरोधी पक्षांच्या संयुक्त रॅलीतून मध्य प्रदेशातील मतदारांना एक चांगला संदेश जाईल. राज्यातील भाजपामध्ये अराजकता माजली असून, त्यांना पराभवाची जाणीव झालीय. त्यामुळं भाजपा नेते काँग्रेसमध्ये येण्यासाठी सरसावले असल्याचे मध्य प्रदेशचे कॉंग्रेसचे प्रभारी सचिव सी पी मित्तल यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. तसंच गेल्या सहा महिन्यांत 40 हून अधिक भाजपा नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून आणखी बरेच नेते सामील होण्याची शक्यता आहे. भाजपाचे काही विद्यमान आमदारही आगामी काळात आमच्या पक्षात सामील होताना दिसतील, असा खुलासा मित्तल यांनी केलाय. अलीकडच्या काळात भाजपा सोडणाऱ्या 40 नेत्यांमध्ये अनेक माजी आमदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपाचे दोन माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र दीपक जोशी आणि राधेलाल बघेल यांनी मे महिन्यांत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांचे निकटवर्तीय बैजनाथ सिंह यादव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नर्मदापूरममधील माजी आमदार गिरिजा शंकर शर्मा यांनी देखील अलिकडच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं, सीपी मित्तल यांनी सांगितलं.
अमित शाहांचे सातत्याने दौरे :शिवराज सिंह चौहान सरकारने गेल्या 18 वर्षांपासून काहीही केलं नाही. त्यामुळं मतदार त्यांच्यावर नाराज आहेत. भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाला याची जाणीव झालीय. म्हणूनच पंतप्रधान मोदींना गेल्या काही महिन्यात दोनदा सागर जिल्ह्याचा दौरा करावा लागला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही सातत्याने राज्यात दौरे करत आहेत. ते पक्षाचं झालेलं नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आता खूप उशीर झालाय, असंही मित्तल म्हणाले.
विधानसभेत युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल :निवडणुकीच्या पार्श्वभूवीवर राज्यातील इंडिया आघाडीचे सदस्य कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये 'देणे आणि घेणे' ही भावना दिसून येत आहे. सूत्रांनुसार, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी 2018 मध्ये बुंदेलखंड प्रदेशात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता आणि त्यांच्या पक्षाने एकमेव बिजावार विधानसभा जागाही जिंकली होती तर सहा जागांवर त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे सपा आता मध्य प्रदेशात सात जागा लढवणार आहे. इंडिया आघाडीचे जागावाटप 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ठरलेले असले तरी, काँग्रेस सपाच्या मागणीकडे लक्ष देत विधानसभेत काही जागांवर मित्रपक्षांसोबत आघाडी करु शकते. या समस्येचे निराकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. सपा काही जागा लढवू शकते, किंवा मध्य प्रदेशात सपा आमच्या उमेदवारांना पाठिंबा देईल आणि आम्ही त्यांच्या उमेदवारांना दुसऱ्या राज्यात पाठिंबा देऊ असंही होऊ शकतं. राजकारणात सर्व पर्याय नेहमीच खुले असतात, मात्र अंतिम निर्णय हायकमांड घेईल, असंही मित्तल म्हणाले.
हेही वाचा :
- CWC : कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाची वर्णी?
- Corruption In BJP: भ्रष्टाचार भाजपच्या रक्तात आणि विचारात - नाना पटोले
- Rahul Gandhi on China : चीनने बळकावलीय भारताची जमीन, पंतप्रधान बोलतात ते साफ खोटं - राहुल गांधी