नवी दिल्ली - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विरोधकांच्या बैठकीवरून जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी नीतीश कुमार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केले आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा सेक्युलर पक्ष असल्याचे सांगितले जाते. मात्र, हो आम्हीच बाबरी पाडली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी छाती ठोकून विधीमंडळात सांगितले होते, असे ओवैसी यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही सेक्युलर पार्टी आहे. उद्धव ठाकरे हे मु्ख्यमंत्री असताना बाबरी आम्हीच पाडली आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे छाती ठोकून विधीमंडळात सांगितले होते - असदुद्दीन ओवैसी, अध्यक्ष- एमआयएम
उद्धव ठाकरे, शरद पवार हजर - देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये देशातील विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सुरुवात होणा गरजेचे होते आणि ती सुरुवात आजपासून झाली असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.