रोहतास (बिहार) : बिहारच्या रोहतासमध्ये एका जुन्या घरातून इतके साप बाहेर आले की ते पाहून लोक आश्चर्यचकित झाले. एकाचवेळी इतके साप पाहून वनविभागाच्या टीमलाही धक्का बसला. रोहतास जिल्ह्यातील सूर्यपुरा येथे एका घरात तब्बल 50 ते 60 साप निघाले आहेत.
दोन डझन सापांना मारले : रोहतास येथील आगेड खुर्द गावातील कृपा नारायण पांडे यांच्या घरातून बुधवारी अचानक एक एक करून अनेक साप बाहेर येऊ लागले. जवळपास अर्धा डझन साप इकडे तिकडे फिरत असल्याचे घरातील लोकांना दिसले. हे पाहून घरात राहणारे लोक घाबरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून या सापांना मारले. मात्र काही वेळाने घरात आणखी साप दिसू लागले. लोकांनी त्यांनाही मारले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन डझन साप मारले. पण तरीही साप बाहेर येणे थांबले नाही. घरातील लोकांनी आणि गावकऱ्यांनी मारूनही जेव्हा साप बाहेर येण्याचे थांबत नव्हते तेव्हा स्थानिक लोकांनीही वनविभाग आणि प्रशासनाला याची माहिती दिली.
जवळपास 30 साप पकडले : माहिती मिळताच जिल्ह्यातील तीन उपविभागातील वनविभागाच्या बचाव पथकाने गुरुवारी गावात पोहोचून सापांचा शोध सुरू केला. सापांना पकडण्यासाठी रेस्क्यू टीमने स्नेक सेव्हर बसवले आणि त्यानंतर जवळपास 30 साप पकडले. सर्पमित्र अमर गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही फरशी आणि भिंतीची वीट फोडून सुमारे 30 साप बाहेर काढले आहेत.