मोरबी (गुजरात) : गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये गुजरातमधील मोरबी शहरात घडलेल्या झुलता पूल कोसळण्याच्या घटनेत पोलिसांनी शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये 135 लोकांचा मृत्यू झाला होता. 1,200 हून अधिक पानांचे हे आरोपपत्र मोरबी सत्र न्यायालयात पोलीस उपअधीक्षक पी.एस. झाला यांनी दाखल केले. झाला जे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत. आधीच तुरुंगात असलेल्या नऊ आरोपींव्यतिरिक्त ओरेवा ग्रुपचा जयसुख पटेल ज्याच्याकडे पुलाचे व्यवस्थपन होते, त्याचे नाव आरोपपत्रात दहावा आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे.
देखभालीची जबाबदारी होती कंपनीवर :30 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या पूल कोसळल्याच्या घटनेच्या संदर्भात मॅजिस्ट्रेट कोर्टाने जयसुख पटेल याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्याच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर १ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. कोसळलेल्या मच्छू नदीवरील ब्रिटीशकालीन झुलत्या पुलाच्या व्यवस्थापन आणि देखभालीची जबाबदारी अजंता मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड (ओरेवा ग्रुप) या कंपनीवर होती. त्यामुळे त्या कंपनीच्या लोकांचेही नाव यामध्ये घेण्यात आले आहे.
आरोपींच्या जामिनावर १ फेब्रुवारीला सुनावणी :मोरबी पुलाच्या नूतनीकरणाचे कंत्राट असलेल्या ओरेवा ग्रुपच्या जयसुख पटेलच्या विरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्याला ७० दिवसांपासून अटक करण्यात आलेली नाही. अद्याप कोणतीही लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली नाही, असे सरकारी वकील संजय व्होरा यांनी काल एएनआयला सांगितले. विशेष म्हणजे, या खटल्यात अटकपूर्व जामिनासाठी पटेल यांनी २० जानेवारी रोजी मोरबी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकील हजर नसल्याने सुनावणी १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.