अहमदाबाद :गुजरातच्या मोरबी पूल प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने ऑरेवा कंपनीला मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींना 2-2 लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
135 लोकांचा मृत्यू झाला होता : गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला गुजरातच्या मोरबी येथे एक पूल कोसळून 135 लोकांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो लोक जखमी झाले होते. दुर्घटना झाली त्यावेळी पुलावर अंदाजे 400 लोक उपस्थित होते. सहा महिन्यांहून अधिक काळ दुरुस्तीसाठी बंद असलेला हा पूल उद्घाटनानंतर काही दिवसातच कोसळला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली होती. ओरेवा ग्रुपने सुमारे 2 कोटी रुपये खर्च करून या ऐतिहासिक झुलत्या पुलाचे नूतनीकरण केले होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पुलावर बरीच लोक पोहोचली होती. पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक पुलावर आल्याने सायंकाळच्या सुमारास पूल कोसळला आणि शेकडो लोक नदीत पडले.