चंदीगड Monu Manesar Arrested :हरियाणाच्या नूहमध्ये झालेल्या हिंसाचाराचा आरोपी मोनू मानेसर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. हरियाणा पोलिसांनी त्याला गुरुग्राम सेक्टर ९ येथून ताब्यात घेतलं. नासिर आणि जुनैद हत्याकांडातील आरोपी मोनू मानेसरचा राजस्थान पोलीस बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते. त्याच्यावर नूह येथं हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे. आता हरियाणा पोलीस त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत.
कोण आहे मोनू मानेसर :मोहित यादव उर्फ मोनू मानेसर हा हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात राजस्थानच्या नसीर आणि जुनैद यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. या हत्याकांडानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, त्याच्याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या. तो गोरक्षणाच्या नावाखाली शस्त्रं चालवतो, असा आरोप त्याच्यावर आहे. मोनू मानेसरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचे धोकादायक आणि स्वयंचलित शस्त्रांसह अनेक फोटो आहेत.
नूह हिंसाचारासाठी मोनू मानेसरचं प्रक्षोभक आवाहन जबाबदार : नूहमध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडल यात्रेच्या एक दिवस आधी ३० जुलैला मोनू मानेसरनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये त्यानं त्याच्या समर्थकांना या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. दुसऱ्या दिवशी या मिरवणुकीत दोन गटांत हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात ५० हून अधिक वाहनं जाळण्यात आली होती. हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हिंसाचारासाठी मोनू मानेसरचं प्रक्षोभक आवाहन जबाबदार असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्याला या प्रकरणी आरोपी करण्यात आलं.
- दुसरा आरोपी बिट्टू बजरंगीलाही अटक :बिट्टू बजरंगी हा या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे. त्याला १५ ऑगस्ट रोजी फरिदाबाद येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषणं देऊन हिंसाचार भडकावल्याचा आरोप आहे.
हेही वाचा :
- Nuh Violence : नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला अटक, चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता
- Haryana Nuh Violence : नूह हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू, 116 जणांना अटक, गुन्हेगाराला सोडणार नाही : मुख्यमंत्री खट्टर
- Haryana Nuh Violence : हरियाणामधील अनेक जिल्ह्यांची इंटरनेट सेवा बंद, आतापर्यंत 165 जणांना अटक