नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारविरोधात आज अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आजही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ झाला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.
Live Update :
- लोकसभा पुन्हा 2 वाजेपर्यंत तहकूब :लोकसभेत विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या ठरावाला मंजुरी दिली आहे. मात्र लोकसभेत विरोधकांनी प्रचंड प्रमाणात गदारोळ केल्याने लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
- लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब :लोकसभेत विरोधकांनी मोठा गदारोळ केला आहे. त्यामुळे लोकसभा सभापतींनी लोकसभेचे कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब केले आहे. विरोधकांनी लोकसबेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे कामकाजही 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
- मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव :विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे.
- कारगील विजय दिनी शहीद जवानांना आदरांजली :भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावून कारगील खोऱ्यातून पाकिस्तानच्या सैन्याला हुसकावून लावले होते. मात्र या हल्ल्यात अनेक भारतमातेच्या सुपूत्रांना प्राणाची बाजी लावावी लागली. त्यांचे स्मरण करण्यासाठी राज्यसभा आणि लोकसभेत आज कारगील विजय दिनी जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब :मणिपूर हिंसाचारावरुन लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर हिंसाचारावर संसदेत निवेदन न केल्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेत विरोधक आक्रमक झाले होते. आपचे नेते संजय सिंह यांनी वेलमध्ये उतरुन निदर्शन केल्यामुळे त्यांचे राज्यसभा सभापतींनी निलंबन केले. त्यामुळे विरोधक अधिकच आक्रमक झाले. विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडल्याने लोकसभा आणि राज्यसभा वारंवार तहकूब करावी लागली.