नवी दिल्ली: दोन दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेचे मान्सून सत्र आज परत सुरू झाले आहे. आतापर्यंत संसदेचे कामकाज वादामुळे चर्चेत राहिले असून आज सभागृहात जबरदस्त गदारोळ पाहण्यास मिळाला. लोकसभेत मणिपूरच्या परिस्थितीवरुन विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीच्या गदारोळात लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान विरोधीपक्षांच्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावरुन परतले आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात मणिपूर हिंसाचारावरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज राज्यसभेत अधिवक्ता (संशोधन) विधेयक सादर केले जाणार आहे.
दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा: अधिवक्ता कायदा 1961 मध्ये सुधारणा करणारे अधिवक्ता (संशोधन) विधेयक 2023 आज राज्यसभेत सादर केले जाणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सादर करणार आहेत. तसेच लोकसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्ली सेवा विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाचे नाव बदलण्यात आले आहे. त्याचे नाव बदलून दिल्ली दुरुस्ती विधेयक 2023 असे करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत चर्चेसाठी पाठवण्यात आले आहे.
आपच्या विरोधाला काँग्रेसचा पाठिंबा: दिल्लीत सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाकडून दिल्ली दुरुस्ती विधेयकाला विरोध करत आहे. या विधेयकावरुन काँग्रेस आणि आपमध्ये वाद निर्माण झाला होता. जर काँग्रेसने आपल्या विरोधाला पाठिंबा दिला तरच आपण विरोधीपक्षांच्या दुसऱ्या बैठकीत हजर राहू, असे आपकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षाने या विधेयकाच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीच्या विरोधाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले तर याला विरोध केला जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे. मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेच्या कामकाजाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.