नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरावावरील चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. आज विरोधकांच्या इंडिया या आघाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज बराच गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. लोकसभा सुरू होताच विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा 12 वाजेपर्यंत तर राज्यसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
Live Update :
- राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप - मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप निघाले आहेत. अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या बाजूने मतदान करणार की विरोधात याची उत्सुकता लागली आहे.
- अविश्वास ठराव प्रस्तावाच्या मतदानासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांनीही आपापल्या खासदारांसाठी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या बाजूने मतदान करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
- विरोधकांचा वॉकआऊट :केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण या अविश्वास प्रस्तावावर बोलत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डीएमकेच्या खासदारांनी वॉकआऊट केला. निर्मला सितारामण यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केल्यामुळेच विरोधक घोषणाबाजी करत बाहेर गेले.
- डीबीटीने जगासमोर ठेवला आदर्श : डीबीटी पद्धतीने देशात प्रचंड यश मिळवले आहे. ही योजना प्रचंड यशस्वी झाल्यामुळे काँग्रेसने या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस काळात डीबीटीचे करोडो रुपये गेले कुठे असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण यांनी लोकसभेत केला. डीबीटी ( Durect Benefit Transfer ) या योजनेला नरेंद्र मोदी सरकराच्या काळातच प्रचंड यश मिळाल्याचा दावा निर्मला सितारामण यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परमात्मा आहेत का ? :काँग्रेसचे नेते पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. आज राज्यसभेत काँग्रेस नेते तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सदनात आल्यानंतर त्यांच्या पुढे आम्ही आमचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र यावेळी विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनीही मोठी घोषणाबाजी केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यामुळे काय होईल, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सांगितले. त्यावर भाजपच्या खासदारांनी गोंधळ केल्यानंतर पंतप्रधान परमात्मा आहेत का, का भगवान आहेत, असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. त्यामुळे चांगलाच वाद झाला. वाढलेल्या गोंधळामुळे सभापतींनी राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करत असल्याची घोषणा केली.