नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. संसदेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या गदारोळाचा सामना करण्यासाठी या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे. यासोबतच या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या विधेयकांवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत मणिपूरच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
विरोधकांना रोखण्यासाठी रणनीती :संसदेत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरल्याने भाजप बॅकफूटवर गेला आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत मणिपूरसह संसदेत विरोधकांना रोखण्यासाठी रणनीती आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित :भाजप संसदीय समितीच्या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर भाजपच्या संसदीय समितीची ही पहिलीच बैठक आहे. संसदेच्या ग्रंथालय भवनात ही बैठक पार पडली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्षांनी गदारोळ सुरू केला आहे. त्यामुळे भाजपच्या दिग्गजांनी या बैठकीत विचारमंथन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत चर्चेला घाबरतात :विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी प्रचंड गदारोळ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मणिपूर हिंसाचारावर निवेदन करण्याची मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली होती. मात्र पंतप्रधान संसदेत मणिपूर प्रकरणावर चर्चा करण्यास घाबरत असल्याची टीका काँग्रेसने केली होती. मात्र, या मुद्द्यावर विरोधकांना अमित शाह यांनी चर्चेचे आवाहन केले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही विरोधी पक्षांनी या विषयावर चर्चा करण्याचे आवाहन केले. या मुद्द्यावरुन आप खासदार संजय सिंह यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले. राज्यसभेतील सभागृहनेते पीयूष गोयल यांनी संजय सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दाखल केला होता.
हेही वाचा -
- Monsoon session : आपचे खासदार संजय सिंह यांचे संपूर्ण पावसाळी अधिवेशन संपेर्यंत निलंबन
- Monsoon Session 2023 : पालघर साधू हत्याकांडावर उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकले नाही, अनुराग ठाकूर यांचा विरोधकांवर हल्लाबोल
- Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन पुन्हा गदारोळ; लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब, राज्यसभेत विरोधक आक्रमक