पाटणा ( बिहार ) : हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशी ( Mohini Ekadashi 2022 ) म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्व एकादशी तिथींमध्ये मोहिनी एकादशी विशेष मानली जाते. मोहिनी एकादशीचे व्रत आज ठेवण्यात येणार आहे. तसे, प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या दोन एकादशी असतात. प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि महत्त्व असते.
एकादशी ही विष्णूला समर्पित आहे:प्रत्येक एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित असते. मोहिनी एकादशीचे व्रत करून विधिनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. मोहिनी एकादशी ही सर्व प्रकारची दु:खं दूर करणारी आणि सर्व पापांचा नाश करणारी मानली जाते. मोहिनी एकादशी व्रताची कथा समुद्रमंथनाशी संबंधित आहे.
मोहिनी एकादशीचे पौराणिक महत्त्व : पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि असुरांनी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अमृत कलश प्राप्त झाले. अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानव दोघांमध्ये वाद झाला. वादाची परिस्थिती एवढी वाढू लागली की, दोन्ही बाजू युद्धाच्या दिशेने जाऊ लागल्या. अशा स्थितीत हा वाद मिटवण्यासाठी आणि देवतांमध्ये अमृत वाटण्यासाठी भगवान विष्णूंनी एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले. या सुंदर स्त्रीचे रूप पाहून असुर मोहित झाले.