कोलकाता :पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचारसभा आज पार पडली. कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानात झालेल्या या सभेत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी ममतांनी आपल्या लोकांना विश्वासघात आणि अपमान केल्याचा आरोप मोदींनी केला.
पक्षातील घराणेशाहीवर मोदींचा निशाणा..
"बंगालच्या लोकांनी ममतांवर विश्वास ठेऊन त्यांना सत्तेत आणले. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यांनी लोकांची 'दीदी' म्हणून काम न करता, आपल्या भाच्याची 'आत्या' या आपल्या भूमीकेकडे जास्त लक्ष दिले." असे म्हणत मोदींनी सत्तेतील घराणेशाहीवर टीका केली. बंगालचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून ममता यांचे भाचे आणि खासदार अभिषेक यांची निवड करण्याचा प्रयत्न तृणमूल करत आहे असा आरोप भाजपा गेल्या काही दिवसांपासून करत आहे. त्यासंबंधी ही टीका मोदींनी केली.
बंगालमधील आणि भारतातील लोक माझे मित्र..
"भारतातील सर्व १३० कोटी लोक हे मला मित्राप्रमाणे आहेत, आणि मी त्यांच्यासाठी काम करतो. माझ्या बंगालमधील मित्रांना मी ९० लाख गॅस कनेक्शन दिलेत. मला चहाबाबत, आणि बंगालमधील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांबाबात आपुलकी आहे ज्यांच्यासाठी मी सामाजिक सुरक्षा योजना सुरू केली" असेही मोदी म्हणाले.