बंगळुरु : देशभरात दररोज अनेक मोबाईलची चोरीची घटना घडत असतात. मोबाईल चोरी करण्याचा सुळसुळाट आपल्याला देशातील सर्व राज्यात पाहायला मिळतो. या मोबाईल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि चोरीच्या मोबाईलचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्रीय गृह विभागाकडून कडक पावले उचलली जात आहे. चोरीच्या मोबाईलचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्रीय गृह विभाग आणि दूरसंचार विभाग यांच्या सहकार्याने सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) उपक्रम राबवण्यात येत आहे. देशभरात हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. सीईआयआरच्या अंमलबजावणीमुळे देशात 6 लाखांहून अधिक चोरीचे मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत, तर 2 लाख 69 हजार 840 मोबाईल सापडले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या राज्यातील सर्वाधिक मोबाईल ब्लॉक :यावेळी पोलिसांनी सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरमार्फत देशातील इतर राज्यात किती मोबाईल ब्लॉक करण्यात आले याची माहिती दिली आहे. दिल्लीत सर्वाधिक मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकाचा नंबर लागतो. महाराष्ट्रात 82 हजार मोबाईल ब्लॉक करण्यात आली आहेत.
किती मोबाईल झाले ब्लॉक : दरम्यान, एकट्या दिल्लीमध्ये 3 लाख 51 हजार मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 2 लाख 4 हजार 107 मोबाईलचा छडा लावण्यात आला आहे. याचबरोबर पोलिसांनी 1 हजार 318 जणांना त्यांचा मोबाईल मूळ मालकाकडे सुपूर्त केला आहे. कर्नाटकात 71 हजार 911 मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 60 हजार 133 मूळ मालकांना त्यांचा मोबाईल परत मिळाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्रात 82 हजार 326 मोबाईल ब्लॉक करण्यात आले आहेत. तर 31 हजार 314 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतरग तेलंगणामध्ये 38 हजार 921 मोबाईल फोन चोरीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी 5 हजार 278 मोबाईल सापडले आहेत. तर पोलिसांनी 2 हजार 777 मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत.