चंदीगढ : प्रजासत्ताकदिनी दिल्लीमधील ट्रॅक्टर परेडच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर आता हरियाणा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सोनीपत, झज्जर, पलवल यांच्यासह एकूण १७ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद..
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ३० जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. यामध्ये सोनीपत, झज्जर, पलवल, अंबाला, यमुनानगर, कुरुक्षेत्र, करनाल, कैथल, पानीपत, हिसार, जिंद, रोहतक, भिवानी, चरखी दादरी, रेवाडी, फतेहबाद आणि सिरसा या जिल्ह्याचा समावेश आहे.
ट्रॅक्टर मोर्चाचे पडसाद : हरियाणाच्या १७ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद या प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
ट्रॅक्टर परेडच्या वेळी झाला होता हिंसाचार..
केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताक दिनादिवशी या संघटनांनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली शांततापूर्ण मार्गाने पार पडणे अपेक्षित होते, मात्र हिंसाचाराच्या काही घटनांनी या परेडला गालबोट लागले. यानंतर काही शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघारही घेतली आहे.
हेही वाचा :शेतकऱ्यांचा जथ्था 6 महिन्यांचे रेशनसह दिल्लीकडे रवाना