राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची त्यांचे वारस म्हणून वर्णी लावली, त्याचवेळी राज ठाकरे यांचा तिळपापड झाला. तेव्हापासूनच आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी राज ठाकरे यांचे प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरू झाले. मात्र याची कुणकुण त्यांना आधीच लागली होती. तरीही प्रत्यक्ष नवीन पक्षाच्या जडणघडणीला महाबळेश्वरमधील उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणेनंतरच सुरुवात झाली.
महाराष्ट्र नवनिर्माणाचा मंत्र - राज ठाकरे यांनी राज्याच्या सर्वांगिण विकासाच्या ब्लूप्रिंटमधून देण्याचा विडा उचलला. त्यासाठी ते स्वतः कामाला लागले. नंतर अनेक दिवस त्यांची ब्लूप्रिंटच जनतेला पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र या ब्लूप्रिंटबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी आधुनिक महाराष्ट्राचे सुंदर स्वप्न रंगवले होते. लोकांना ते भुरळ पाडणारे होते. त्यातूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढलेल्या पहिल्या निवडणुकीतच त्यांनी घवघवीत यश मिळवले. तब्बल १३ आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले. त्याचबरोबर नाशिकसारखी मोठी महानगरपालिकाही राज ठाकरे यांच्या पक्षाच्या ताब्यात आली. तिथे गोदावरी विकासाची मोठी महत्वाकांक्षी योजना राबवण्याचा त्यांनी संकल्प केला. मात्र ती व्यवस्थित पूर्णत्वास गेल्याचे दिसत नाही.
मनसेची बहार - सुरुवातीच्या काळातील राज ठाकरे यांच्या पक्षाकडे तरुणांचा ओढा मोठा होता. उद्धव ठाकरे यांची तुलनेने मवाळ भूमिका पाहता आक्रमक राज ठाकरे अख्खी शिवसेनाच गिळंकृत करतात की काय असा विचार त्यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. टोलचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा असे लोकप्रिय मुद्दे घेऊन राज ठाकरे यांचे सुरुवातीच्या काळातील राजकारण फुलले बहरले. मात्र खळ्ळ-खट्याक हा शब्द मागे राहिला. बाकी सगळे गंगेला मिळाले असेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ वर्षानंतरच्या परिस्थितीबाबत म्हणावे लागते. बाळासाहेबांची बोलण्याची स्टाईल राज ठाकरे यांच्यामध्ये दिसते. लोक त्यांच्या भाषणालाही गर्दी करतात. मात्र या गर्दीचे परिवर्तन मतांमध्ये होताना दिसत नाही तर पक्षाला आजपर्यंत उतरती कळाच लागलेली दिसते.
फक्त झेंड्यामध्ये सर्वसमावेशकता - मनसेची सुरुवात सर्वसमावेषकतेने झाली असे त्यांच्या झेंड्यावरुन म्हणावे लागेल. विविध रंगी झेंडा खांद्यावर घेऊन सर्वांच्या सोबतीने राजकारण करणार अशी प्रतिमा जनतेच्या मनात राज ठाकरे यांनी निर्माण केली. सगळ्यांना ती भावलीही. मनसेचे पक्षचन्ह असलेल्या रेल्वे इंजनला विविध सामाजिक एकसंघतेचे डबे जोडले जातील आणि ही रेल्वे महाराष्ट्रात सुसाट धावत सुटेल असा कयास त्या काळाच धुरिण राजकारण्यांनी लावला होता. मात्र नंतरच्या काळात राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांच्यामुळे त्यांच्या नेत्यांसह कार्यकर्ते आणि एकूणच राज ठाकरे यांच्या कडे आस्थेने पाहणाऱ्या प्रत्येकाचाच भ्रमनिरास झाला. त्यामुळेच त्यांच्या सभांना जरी गर्दी होत असली तरी त्याचे परिवर्तन मतांमध्ये होताना दिसले नाही.