चेन्नई MK Stalin Interview : 'ईटीव्ही भारत'नं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याशी विविध विषयांवर खास बातचीत केली. यावेळी बोलताना स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रभाषा हिंदी, इंडिया आघाडीवर चर्चा केली. स्टॅलिन म्हणाले की, 'निवडणुकीच्या मैदानात भगव्या पक्षाच्या जातीय राजकारणाला विरोध करणारे सर्व लोकशाही पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणं शक्य आहे. तसेच आव्हानांना न जुमानता सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी द्रविड मॉडेल कसं कटिबद्ध आहे याबद्दलही त्यांनी सांगितलं.
प्रश्न : उत्तर भारतात अतिशय मजबूत असलेल्या हिंदुत्वाच्या राजकारणाला मोडून काढण्यासाठी 'इंडिया आघाडी'ची रणनीती काय आहे?
उत्तर : भाजपाकडे जातीयवादाशिवाय दुसरी कोणतीही विचारधारा नाही. ते आपल्या कामगिरीवर मतं मिळवू शकत नाही. म्हणूनच ते द्वेषाच्या राजकारणावर अवलंबून आहेत. मात्र इंडिया आघाडीची ताकद धार्मिक सलोखा आहे. आमचा घटनात्मक तत्त्वांवर विश्वास आहे. तसेच जनतेला भेडसावणार्या मूलभूत समस्यांवर आमचा भर आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात भाजपाच्या जातीयवादी राजकारणाला विरोध करणार्या सर्व लोकशाही शक्तींना एकत्र आणणं INDIA ब्लॉकची रणनीती आहे.
प्रश्न : द्रमुक राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे का? तुमची भाषणं यापूर्वी कधीच हिंदीत प्रकाशित होत नव्हती, मात्र आता ती होत आहेत. तुम्ही पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगता का?
उत्तर : द्रमुक हा राष्ट्रीय राजकारणातील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. एम करुणानिधी यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बँक राष्ट्रीयीकरणासह पुरोगामी उपायांना पाठिंबा देऊन राष्ट्रीय राजकारणात पक्षाचा ठसा उमटवला होता. आणीबाणीच्या काळात, त्यांनी लोकशाही आवाजाचं नेतृत्व केलं होतं. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दोन्ही सरकारमध्ये द्रमुक हा महत्त्वाचा भागीदार होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रमुकची भूमिका यशस्वी ठरली. सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन द्रमुक सोशल मीडियासह अनेक मार्गांनी इंडिया ब्लॉकच्या कामकाजात योगदान देत आहे. 'मला माझी उंची माहित आहे', असं आमचे नेते करुणानिधी म्हणाले होते. एमके स्टॅलिनलाही त्याची उंची चांगलीच ठाऊक आहे.
प्रश्न : केंद्र सरकार प्रत्येक नवीन विधेयकाला हिंदी नाव देत आहे. पूर्वीच्या कायद्यांचंही नाव हिंदीत बदललं जातंय. हिंदी वर्चस्वाला विरोध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रमुकची आणि तामिळनाडूची यावर प्रतिक्रिया काय असेल?
उत्तर : द्रमुकच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी हिंदीतील निमंत्रणं फाडून आपला निषेध नोंदवला. भाजपाच्या 'एक राष्ट्र, एक भाषा' या छुप्या धोरणाचा द्रमुक सातत्यानं विरोध करतोय. हे धोरण केवळ तामिळच नाही तर इतर राज्यांतील सर्व भाषांना घातक आहे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. मात्र कोणतीही भाषा लादण्याला आमचा ठाम विरोध आहे. संसदीय निवडणुकीनंतर नवीन सरकार सर्व भाषांना समान दर्जा आणि महत्त्व देईल.