आयझॉल Mizoram Assembly Result 2023 : मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली होती. आतापर्यंत लागलेल्या निकालावरुन राज्यात सत्ताबदल होणार हे निश्चित झालंय. माजी आयपीएस लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील नवीन पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) हा पक्ष सध्या आघाडीवर असून आतापर्यंत या पक्षानं 14 जागांवर विजय साजरा केलाय. तर 13 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) पक्षानं 3 जागा जिंकल्या असून 7 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. भारतीय जनता पक्षानंही 2 जागंवर विजय मिळवत मिझोरममध्ये आपलं खात उघडलंय. तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
काय म्हणाले अधिकारी : अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी एच लियानझेला म्हणाले, विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 मतमोजणी सभागृहे बांधण्यात आली आहेत. तसंच सर्व 11 जिल्हा मुख्यालयांच्या स्ट्राँग रूममध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) सुरक्षितपणे ठेवण्यात आली आहेत. तसंच पोलिस महासंचालक अनिल शुक्ला यांनी सांगितलं की, मतमोजणीसाठी पुरेशा सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि मिझोराम सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आले आहेत.
174 उमेदवारांच भवितव्य ठरणार :40 सदस्यीय मिझोराम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान झालं. एकूण 8.57 लाख मतदारांपैकी 80 टक्क्यांहून अधिक मतदारांनी 16 महिलांसह 174 उमेदवारांचं भवितव्य ठरवण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला होता. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेसनं सर्व 40 जागांवर उमेदवार उभे केले होते. तर आम आदमी पार्टीनं चार जागांवर आपले उमेदवार दिले होते. याशिवाय 27 अपक्ष उमेदवारही रिंगणात होते. भाजपानं भाषिक अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करुन 23 जागांवर उमेदवार उभे केले होते.
दोन्ही पक्षांचा सत्ता स्थापनेचा दावा : सध्या मिझोराममध्ये झोरामथांगाच्या मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता आहे. सत्ताधारी MNF चे झोरमथांगा सत्तेत राहण्याचा दावा करत आहेत. त्याच वेळी, माजी आयपीएस लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालील नवीन पक्ष झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) देखील विजयाचा दावा करत आहे. यामुळं राज्यात कोणाची सत्ता येईल हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
- 'लाडली'मुळं मध्य प्रदेशात पुन्हा एकदा शिव'राज'; पाचव्यांदा भाजपानं कशी मिळविली सत्ता?
- राजस्थानात कमळ फुललं! काँग्रेसचा दारुण पराभव; अनेक दिग्गजही पराभूत
- छत्तीसगडमध्ये भाजपानं दिला कॉंग्रेसला जोरदार झटका; काय आहेत काँग्रेसच्या पराभवाची कारणे?