नवी दिल्ली :विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा मनमानी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. काँग्रेससह 14 राजकीय पक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या अजेंड्यानुसार विरोधी पक्षांच्या याचिकेवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला हेही या खंडपीठाचा भाग आहेत.
2014 नंतर वाढ : ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी 24 मार्च रोजी या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचा उल्लेख केला होता. 2014 मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) द्वारे दाखल केलेल्या खटल्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला होता. या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, सरकारद्वारा विरोधी पक्षांचे नेते आणि इतर नागरिकांवर त्यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे फौजदारी कारवाई केली जात आहे.