नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे आयोजकांनी जगप्रसिद्ध मिस वर्ल्ड2021 (Miss World 2021 Postponed) स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. चाचणीत 16 स्पर्धक कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा गुरुवारी सॅन जुआनमधील कोलिसिओ डे पोर्तो रिको येथे संपणार होती. परंतु सध्या ती पुढे ढकलण्यात आली आहे. आयोजकांनी मिस वर्ल्डच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ही घोषणा केली आहे. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व मानसा वाराणसी (Miss India 2020 Manasa Varanasi) ही करणार आहे.
अहवालानुसार, कोविडसाठी सकारात्मक चाचणी घेतलेल्या 16 लोकांमध्ये भारतातील मानसाचा समावेश आहे. इन्स्टाग्रामवरील अधिकृत फेमिना मिस इंडिया पेजने याची पुष्टी केली आहे. 23 वर्षीय मानसाने मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा ताज जिंकला. मानसाचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. मानसा वाराणसीने फेमिना मिस इंडिया 2020 चा 'किताब जिंकला आहे. मिस वर्ल्ड 2021 साठी ती एक प्रबळ दावेदार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रतिभावंत महिलांसह एकूण 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे आयोजकांनी सांगितले. येत्या 90 दिवसांच्या आत मिस वर्ल्ड स्पर्धा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धक आणि संबंधित कर्मचार्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यास त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली जाईल.