नवी दिल्ली :दूध खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त खिसा मोकळा करावा लागणार आहे. येत्या काही दिवसांत दुधाचे दर आणखी वाढू शकतात. चाऱ्याच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या दुधाच्या दरात आणखी वाढ करू शकतात. गेल्या काही महिन्यांपासून दुधाच्या दरात इतकी वाढ होत आहे की, गेल्या ६-७ वर्षांत दुधाच्या दरात एवढी वाढ झाली नव्हती. अशाप्रकारे गेल्या 10 महिन्यांत दूध 9 रुपयांनी महागले आहे. मार्च 2022 पासून दुधाचे दर वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, जी आजतागायत थांबलेली नाही.
दुधाचे भाव का वाढणार? :दुधाचे दर वाढण्यामागे चारा टंचाई आणि महागाई हे कारण आहे. गव्हाचा उपयोग गुरांसाठी चारा म्हणून केला जातो. मात्र गव्हाची निर्यात वाढल्याने पुरेशा स्वरूपात चारा उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत आहे. त्याच वेळी, 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये चाऱ्याची किंमत 20 टक्क्यांनी वाढली आहे. चारा महागाई या दृष्टिकोनातून समजून घ्या की, फेब्रुवारी महिन्यात हरियाणामध्ये गव्हाचा कोंडा 900 रुपये प्रति क्विंटल दराने उपलब्ध होता, तर राजस्थानमध्ये 1600 रुपयांच्या वर होता. तिसरे कारण म्हणजे कोरोनाच्या काळात दूध विक्री न झाल्यामुळे पशुपालकांना जनावरांची संख्या कमी करावी लागत आहे.